पुणे : पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि मराठी रंगभूमीवरील अजरामर अशा १०० कलाकृतीमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा यांनी शुक्रवारी सकाळी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होतं शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्या निमित्त काढण्यात आलेल्या भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीचे.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीड़ा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघालेल्या या भव्य शोभायात्रेत ३०० दुचाकी, १० रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि १०० विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या १०० व्यक्तिरेखांचा समावेश होता.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, नाटय परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे शाखेचे विजय पटवर्धन, रजनी भट,जयमाला इनामदार,दीपक रेगे,माधव अभ्यंकर,सुनील गोडबोले, गिरीश ओक,शोभा कुलकर्णी,अभिजित बिचुकले यांच्यासह पुण्यातील कलावंत, नाटय परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ही रथयात्रा आणि बाईक रॅली गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोहचली, त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रंगमंच पूजन तसेच प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन आज (शुक्रवार) होणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.