लोणी काळभोर (पुणे): एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित ‘सायफेस्ट २०२४’ द्वारे राष्ट्रीय विज्ञान परिषदेचा समारोप करण्यात आला. या दोन दिवसांच्या उत्साहपूर्ण विज्ञान मेळ्यासाठी महाराष्ट्रातील ५० हून अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थी एकत्र आले होते. शिक्षण मंत्रालयाच्या इन्स्टिट्युशन इनोवेशन कौन्सिलच्या सहकार्याने व विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात १०० हून अधिक वैज्ञानिक प्रकल्पांचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामध्ये विविध तंत्रज्ञान आणि उत्पादन तयारी स्तरावरील नवकल्पनांवर प्रकाश टाकण्यात आला.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड यांनी मान्यवरांच्या समवेत या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी प्र. कुलगुरू डाॅ. अनंत चक्रदेव, डाॅ. नचीकेत ठाकूर, डाॅ. विरेंद्र शेटे, डाॅ. मिलिंद ढोबळे, डाॅ. आनंद बेल्हे, डाॅ. सुदर्शन सानप व विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ. सुराज भोयार आदी उपस्थित होते. प्रा.डॉ. कराड यावेळी म्हणाले, सायफेस्ट हा विद्यार्थ्यांसाठी केवळ त्यांच्या नवकल्पना मांडण्यासाठीच नव्हे तर त्यांच्या समवयस्कांकडून शिकण्याचा आणि प्रेरित होण्याचा एक टप्पा आहे. वैज्ञानिक विचारातील शाश्वतता आणि अध्यात्माची बांधिलकी ही आमच्या विद्यापीठाची ओळख असून आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर कायमच भर देतो.
एमआयटी विश्वशांती गुरुकुल, लेडी झुबेदा कुरेशी इंग्लिश प्रायमरी हायस्कूल, साधना विद्यालय आणि पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उत्कृष्ट प्रकल्प सादर केले, ज्यामुळे त्यांना विजेते घोषित करण्यात आले. यंदाचा सायफेस्ट हा विज्ञान, टिकाऊपणा आणि अध्यात्म आदी थिमवर आयोजित करण्यात आला होता. ज्याची सांगता स्पेक्ट्रा – कल्चरल नाईटने झाली, ज्यात बँड नाईट, सिंगिंग आणि ग्रुप डान्स यांसारखे मंत्रमुग्ध करणारे कलाअविष्कार विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले.
सायफेस्टचे आयोजक व निमंत्रक प्रा. डॉ. सुराज भोयर यांनी याप्रसंगी प्रदर्शनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी केवळ नाविन्यपूर्ण कल्पना नव्हे तर त्यांच्यात असणाऱ्या आध्यात्मिक वारशासह स्वतःमध्ये असणाऱ्या विविध कलागुणांचे सादरीकरण करताना सर्वांची मने जिंकली, असे अखेरीस डाॅ. भोयार यांनी म्हटले.