संतोष पवार
पुणे : ग्रामीण जीवनातील वास्तव चित्रणाचे लेखन आणि विविध साहित्य संपदा निर्मितीसाठी दिल्या जाणारा राष्ट्रीय पातळीवरील साहित्य रत्न पुरस्कार २०२४ डॉ दादासाहेब कोळी यांना नुकताच प्रदान करण्यात आला. अविष्कार सोशल आणि एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर भारत शाखा माणगाव (जि . रायगड ) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षकदिन राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक/शिक्षिका पुरस्कार प्रदान सोहळा (२०२४) व साहित्यिकांचा गुणगौरव कार्यक्रमाचे करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. दादासाहेब कोळी यांना राष्ट्रीय पातळीवरील साहित्यरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकासमंत्री तथा रायगड जिल्हाच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार भरतशेठ गोगावले शिवसेना उपनेते तथा विधिमंडळ पक्षप्रतोद महाराष्ट्र राज्य, माणगाव रायगडचे प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक विजयशेठ मेथा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आविष्कारचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, संजयजी पवार (पत्रकार), कोकण विभागीय अध्यक्ष संदीप नागे, रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे व मानगाव रायगडच्या सामाजिक कार्यकर्त्यां सुवर्णा जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.डॉ.दादासाहेब कोळी हे श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय बावडा (ता.इंदापूर) येथे मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा माती आणि संस्कृती,(डॉ. द.ता.भोसले समीक्षाग्रंथ),ग्रामीण कथाकार भास्कर बडे हे दोन समीक्षा ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांनी आत्तापर्यंत जिल्हा ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक शोधनिबंध सादर केले आहेत.
विविध मासिकातून त्यांची पुस्तक परीक्षणे प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या आधार, बिथरलेली मनं, पाचूट, या कथा वेगवेगळ्या मासिकातून प्रसिद्ध झाल्या असून वर्तमानपत्रातून इतर लेखनही प्रसिद्ध झाले आहे. त्यांना आजतागायत नऊ वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. दादासाहेब कोळी हे ग्रामीण कथालेखक व उत्तम समीक्षक असून त्यांच्या ग्रामीण कथात आजचे ग्रामीण वास्तव चित्रण पहावयास मिळते. त्यांच्या ग्रामीण साहित्य लेखनासाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवरील साहित्यरत्न गौरव पुरस्कार -२०२४ देऊन अविष्कार फाउंडेशनच्या वतीने मानपत्र, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री आणि राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष, हर्षवर्धन पाटील, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव किरणराव पाटील सर्व संचालक मंडळ आणि विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. घोगरे, उपमुख्याध्यापक जी.जे.जगताप, पर्यवेक्षक हासे डी.व्ही.आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.