भोर : नसरापूर ग्रामपंचायतीने दिव्यांग कल्याण निधीमध्ये अनियमितता आणून १८ दिव्यांग लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवले आहे. नसरापूर ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी २०१४-१५ ते २०२२-२३ या कालावधीतील ३ लाख ६४ हजार ९९२ रुपये निधीचा लाभ दिव्यांगांना दिलाच नाही; तर केवळ कागदी घोडे नाचवत, वरिष्ठांच्या मार्गदशनाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला आहे. वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून शासकीय नियमानुसार कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ उकिरडे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य शासन निर्णय २५ जून २०१८ मधील मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामपंचायतीच्या एकूण स्वउत्पन्नातील ३ ते ५ टक्के निधी दिव्यांग लाभार्थींच्या वैयक्तिक व सामूहिक कल्याणासाठी १०० टक्के खर्च करणे बंधनकारक आहे. परंतु नसरापूर ग्रामपंचायतीने २०१४-१५ ते २०२२-२३ या कालावधीत तब्बल ३ लाख ६४ हजार ९९२ रुपये एवढा निधी खर्च केलेलाच नाही. संबधित निधीच्या खर्चाबाबत वेळोवेळी शासकीय लेखापरिक्षणात त्रुटी दाखविल्या असताना, ग्रामपंचायत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करून दिव्यांगांना न्याय हक्कापासून वंचित ठेवले आहे.
याबाबत नसरापूर (ता. भोर) येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ उकिरडे यांनी २०२१ पासून या बाबीचा पाठपुरावा केला असता, ही सत्य परिस्थिती उजेडात आली. उकिरडे हे नसरापूर ग्रामपंचायतीकडे दिव्यांगांच्या निधीच्या खर्चाची माहिती २०२१ पासून विचारत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांनी माहिती देण्यास टोलवाटोलवी केली आहे. परिणामी निधीची माहिती देण्यास २०२३ साल उजाडले, तरी वेळेवर माहिती दिलेली नाही. केवळ कागदी घोडे नाचवत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबल्याचा आरोप उकिरडे यांनी केला आहे.
भोर तालुका गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांनी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून, २०१४ ते २०२३ या कालावधीतील दिव्यांग निधीची माहिती घेवून, ३ लाख ६४ हजार ९९२ रुपये निधीचा अनुषेश बाकी असल्याचे कबुल केले असून, हा निधी नियमानुसार खर्च करण्याच्या सूचना नसरापूर ग्रामपंचायतीला दिल्या आहेत.
मार्च २०२४ च्या आत निधी खर्च करणार
सन २०१४-२०१५ ते सन २०२२-२०२३ या कालावधीतील दिव्यांगांना ३ टक्के व ५ टक्के वैयक्तिक लाभाचा निधी तत्कालीन व विद्यमान कार्यकारी पदाधिकारी यांच्या निर्णयानुसार खर्च करण्यात आला आहे. उर्वरीत सार्वजनिक स्वरूपाच्या लाभाचा निधी खर्च करणे अद्याप बाकी आहे. हा निधी खर्च करण्याबाबत विद्यमान कार्यकारी पदाधिकारी मासिक सभेत निर्णय घेवून, मार्च २०२४ च्या आत खर्च करणार आहे.
– विजयकुमार कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत नसरापूर
संबंधितांना बडतर्फ करावे
सन २०१४ ते २०२३ या कालावधीत नसरापूर ग्रामपंचायतीने दिव्यांग कल्याण निधी खर्चामध्ये अधिकारी आणि पदाधिकारी यांनी संगनमताने जाणीवपूर्वक दिव्यांगांना त्रास देण्याच्या अनुषंगाने ३ टक्के व ५ टक्के निधीचा संपूर्ण खर्च केलेला नाही. त्यामुळे सर्व संबंधितांवर शासन नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे.
– सामाजिक कार्यकर्ते, सोमनाथ उकिरडे, नसरापूर