शर्मिला साळुंखे
पुणे: राजस्थान राज्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या जयपूरमध्ये दोन दिवस मुक्काम करून अरावली पर्वत रांगेच्या कुशीत विसावलेल्या पुष्कर मेळाव्याला गुलाबी थंडीतच आम्ही पोहोचलो. रोटरी युथ एक्सचेंज कार्यक्रमाअंतर्गत सात देशातून आलेले वीस विद्यार्थी आमच्या बरोबर होते.
पुष्कर तलावाच्या काठाशी छोट्याशा टेकडीवर ब्रम्हा मंदिर मोठ्या दिमाखात स्थित आहे. भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व असलेले जगातील एकमेव ब्रम्हा मंदिर आहे. सायंकाळी आरतीच्या वेळीच आम्ही दर्शन घेतले. त्यानंतर गऊ घाटावर पुष्कर तलावाचे दर्शन घेतले. तलावाच्या काठाला केलेल्या विद्युत रोषणाईचे प्रतिबिंब पाण्यामध्ये सुंदर दिसत होते. आजू – बाजूला टेकड्या, गऊ घाट, वराह घाट व इतर अनेक घाट आहेत. या घाटावर पवित्र स्नान व पूजा-अर्चा होतात. येथे हिंदू संस्कृतीचा वारसा स्थानिक लोकांनी जपलेला आहे. श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या देशी गायी येथे पाहायला मिळतात. येथील लोक शाकाहारी आहेत. हॉटेल्स, खाद्यपदार्थाच्या ठिकाणी कोठेही मांसाहार मिळत नाही. पण, साजूक तुपातले पदार्थ विशेषतः मालपुहा, सोहन हलवा यांची चव जिभेवर रेंगाळत राहते. सुवासिक देशी गुलाबांच्या पाकळ्यांचा सुमधुर गुलकंद हे या ठिकाणी विशेष प्रसिद्ध आहे. स्थानिक पातळीवर लोकांची खूप गरिबी आणि खूप श्रीमंती पाहायला मिळते. नागरी सुविधांबाबत सरकारी पातळीवर दुर्लक्षित, पण विदेशी लोकांनी डोक्यावर घेतलेले हे नगर आहे.
कार्तिक शुद्ध आठ(गोपाष्ठमी) ते कार्तिक पौर्णिमा या हिंदू तिथीनुसार येथील विस्तीर्ण मैदानावर पुष्कर मेळावा भरतो. या ठिकाणी आम्ही मेळाव्याच्या मैदानावर उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी सकाळी दहाला पोहोचलो. पारंपरिक पूजा व विधी झाल्यानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ध्वजारोहण व सरकारी पोलीस पथकाच्या वाद्यवृंदाने राष्ट्रगीत सादर केले. याठिकाणी रंगीबेरंगी राजस्थानी पेहरावातील अबाल वृद्धांची लगबग दिसत होती. जगभरातून आलेल्या विदेशी लोकांसाठी खास आसन व्यवस्था होती. मैदानावरच्या वाळूतील उंटाचे शिल्प लक्ष वेधून घेत होते. त्या शिल्पातून उंट वाचवा हा संदेश दिला होता.
पुष्कर मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी तेथील स्थानिक शाळेच्या दोन ते तीनशे मुलींनी रंगीबेरंगी बांधणीमधील घागरा चोली परिधान करून केलेले राजस्थानी लोकनृत्य विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले. हजारो कॅमेऱ्यांनी राजस्थानी लोकनृत्य टिपले. लगेचच मैदानात देशी संघ व विदेशी संघ अशी फुटबॉल मॅच रंगली. याला ‘लगान’ मॅच हे नाव होते. हे लगान नाव भूतकाळातील इंग्रजांच्या अधिराज्याची आठवण करून देत होते. मैदानावर सजवलेले उंट, उंटाच्या सफारीसाठी सजलेल्या उंट गाड्या होत्या. पारंपारिक खेळ सुरू होते. मैदानाबाहेर शेजारीच मोकळ्या जागी लाखो उंट, घोडे, गायी यांचा बाजार भरलेला पाहायला मिळाला. येथील उंटांचा बाजार जगातील दोन नंबरचा मानला जातो. हा बाजार आम्ही चालत तेथील मोठा पापड खात पाहण्याचा आनंद घेत फिरलो.
संध्याकाळी सातच्या सुमारास पुन्हा मैदानावर गेलो. मैदानावर आकर्षक सजावट केलेला भव्य रंगमंच होता. पंजाबी प्रसिद्ध गायक ‘नवराज हंस’ (दलेर मेहेंदी यांचे जावई) यांनी सुफी गायनाने सुरुवात करून नंतर उडत्या चालीची पंजाबी व राजस्थानी गाण्याच्या ठेक्यावर सर्व देशी, विदेशी प्रेक्षकांना थिरकायला लावले. दोन तास प्रेक्षक नाचतच होते. अशाप्रकारे पुष्करची आठवण घेऊन सकाळी नऊ वाजता आम्ही सुप्रीसिद्ध करणी मातेचे दर्शन घेण्यासाठी तेथून बिकानेरला निघालो.
(लेखिका या शिक्षिका असून त्या पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लोणी काळभोर, पुणे येथे कार्यरत आहेत)