पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सभांचा धडाका सुरु केला आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय, राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभा आणि रोडशो आणि रॅलीचे नियोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ मंगळवारी (दि. १२ नोव्हेंबर) धडाडणार आहे. यानिमित्त होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू असून, मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यभर सुमारे दहा सभा घेणार आहेत. त्यातील एक सभा पुणे शहर व जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्यादृष्टीने मैदानावर बंदिस्त अशा भव्य व्यासपीठाचे काम सुरू आहे. याशिवाय डी एरिया, मैदानाचे सपाटीकरण, लाइटव्यवस्था आदी कामे सुरू आहेत.
पोलिसांचा बंदोबस्त तैनात
मैदानाच्या प्रवेशद्वारांवर आत्तापासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. या मैदानावर एक लाख खुर्च्या उपलब्ध केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शहर व जिल्ह्यातील महायुतीच्या २१ उमेदवारांसाठी होणार आहे. त्यामुळे या सभेला जास्तीत जास्त गर्दी करण्याचे नियोजन केले जात आहे.
४ दिवसांत ९ प्रचारसभांचे नियोजन
राज्यभरात ८ नोव्हेंबरपासून नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा सुरू करण्यात आल्या आहेत. ४ दिवसांत पीएम मोदींच्या ९ प्रचारसभांचे नियोजन राज्यभरात करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या सभांचा श्रीगणेशा उत्तर महाराष्ट्रातून करण्यात आला असून ८ नोव्हेंबर रोजी मोदींची धुळे आणि नाशिकला सभा झाली. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी नांदेड, अकोला, चिमूर येथे त्यांची सभा होणार आहे. १२ नोव्हेंबरला पुणे येथे सभा होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी सोलापूर आणि कोल्हापूर येथे सभा पार पडेल. तसेच छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई येथे १४ नोव्हेंबर रोजी त्यांची सभा होणार आहे.