पुणे : पुणे , शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधील महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी जाहीर प्रचार सभा होणार आहे. एस.पी कॉलेजच्या मैदानावर सांयकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. या सभेमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलंच ढवळून निघणार आहे.
दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सात मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये तेरा मे रोजी मतदान पार पडणार आहे. बारामती लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुण्यात माजी महापौर मुरलीधर माेहोळ, शिरूरमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये खासदार श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
पुणे जिल्ह्यातील या चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद मोदी हे पुण्यात २९ एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. शहरातील एसपी कॉलेजच्या मैदानावर सांयकाळी सात वाजता ही सभा पार पडणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.