योगेश पडवळ
Narayangaon News : पाबळ : केंद्र व राज्य सरकारने कांदा व टोमॅटोचे दर पाडले. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम मंत्री करत आहेत. टोमॅटो, कांदा महाग झाल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून टोमॅटो आयात केली. कांद्यावर निर्यात शुल्क लागू केले. टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना अल्प दरात उपलब्ध करून दिले. आता टोमॅटोचे भाव मातीमोल झाले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने किमान २५ रुपये प्रति किलो या दराने टोमॅटो खरेदी करावेत, अन्यथा मुंबई येथे मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम व शिवसेनेचे तालुकाप्रमुख (ठाकरे गट) माऊली खंडागळे यांनी दिला.
टोमॅटोचे भाव मातीमोल
नाराणगाव (ता. जुन्नर) येथे टोमॅटो बाजारात शेतकरी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी (ता. १८) सकाळी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. (Narayangaon News) या वेळी बोलताना निकम म्हणाले की, शेतकरी हित व विकासासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह आमदार अतुल बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेऊन, कांदा उत्पादक व टोमॅटो उत्पादकांचा व्यथा मांडावी, व आम्हाला न्याय द्यावा.
जुन्नर व मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची कांदा अनुदानाची सुमारे १९ कोटी रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. नाफेड मार्फत २४ रुपये १० पैसे दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप कांदा खरेदी सुरू केली नाही. टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर शासनाने टोमॅटो खरेदी केली. (Narayangaon News) मात्र, भाव कमी झाल्यानंतर कोणती उपाययोजना केली जात नाही. शासनाने टोमॅटो उत्पादकांना अनुदान द्यावे. २५ रुपये प्रति किलो या दाराने टोमॅटो खरेदी करावेत, अन्यथा मुंबई येथे मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्यात येईल.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार १ ऑक्टोबर रोजी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या वेळी त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या जातील. टोमॅटो आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असेही निकम यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Narayangaon News : पैगंबर जयंतीचा जुलूस गणेश विसर्जनादिवशी काढणार नाही; मुस्लिम समाजाचा निर्णय