शिरूर : ग्यानबा तुकाराम…ग्यानबा तुकाराम…चा जयघोष करत ‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच…’ सनईच्या सुरात पारंपारिक ताशा डफ आणि ढोल लेझीमच्या तालावर पुरूष तर महिला, तरूणींनी कलश मिरवणुकीत रंगत आणली होती.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे बुधवार (ता. ६) गावातून सवाद्य नंदी व कलशाची मिरवणूक काढण्यात आली होती. कर्णकर्कश डीजेला फाटा दिल्याने ग्रामस्थांनी या मंडळाचे व मिरवणुकीचे कौतूक केले. गुरूवारी (ता. ७) कवठे येमाई (ता. शिरूर) येथील महादेव मळ्यातील महादेवाच्या मंदिराचा नंदी स्थापना व कलशारोहण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी श्रीराम मित्र मंडळ येडे-बोऱ्हाडे वस्ती (महादेव मळा) व शिवगर्जना मित्र मंडळ वागदरे वस्ती यांनी परिश्रम घेतले होते.
या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिरात नंदी स्थापना व कलशारोहण तुळशीराम महाराज सरकटे यांचे हस्ते पार पडला. सायंकाळी हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. ८) महाशिवरात्रीनिमित्त वैभव महाराज झेंडे यांचे कीर्तन होणार आहे. या काळात खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.
तर शनिवारी (ता. ९) मोहन महाराज सानप यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आंबेगाव बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम यांनी भेट दिली.