पुणे: प्राध्यापक नामदेव जाधव यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. परंतु, निवडणूक लढणार हे जाहीर करताना जाधव यांनी एक मोठा दावा केला आहे. छत्रपत्री शिवाजी महाराजांनी आपल्या स्वप्नात येऊन ही निवडणूक लढवण्यासाठी दृष्टांत दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या जन्मात आपण लखुजी जाधवराव होतो. ज्याप्रमाणे महाराजांना गुप्तधन सापडलले, त्या पद्धतीने आपल्यालादेखील जमिनीखाली गुप्तधन सापडेल, असं वक्तव्य नामदेव जाधव यांनी केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होईल अशी चर्चा असतानाच आता या निवडणुकीत नामदेव जाधव हे उतरणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नात आपल्याला दृष्टांत दिल्याचा दावा जाधवांनी केला असून नियतीनेच मला राजकारणात आणल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नामदेव जाधव म्हणाले की, ”माजी मंत्री विजय शिवतारेंनी माघार घेतल्यानंतर मला अनेकांचे मेसेज आले. तुम्ही पुरंदरचे असून तुमचे आजोळ बारामतीचे आहे. मग तुम्ही यासाठी पुढाकार का घेत नाही? त्यानंतर मी विचार करायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं केंद्रबिदू असलेला हा एक मतदारसंघ आहे. ज्या रायरेश्वर मंदिरात शिवरायांनी शपथ घेतली ते मंदीर देखील इथेच आहे. महाराजांनी ताब्यात घेतलेला तोरणा किल्लादेखील इथेच आहे. संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला पुरंदर किल्लादेखील या मतदारसंघात आहे. परंतु, एकाही किल्ल्यांचा विकास झालेला दिसत नाही. या किल्ल्यांचा विकास करावा लागणार आहे. बारामतीमधून मी निवडणूक लढावी अशी अनेकांची इच्छा होती. हे होत असताना शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असलेल्या दिवशी म्हणजेच 3 एप्रिलला मला पहाटे दृष्टांत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या स्वप्नात येऊन मला निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला.”
प्राध्यापक नामदेव जाधव यांनी जरी हा दावा केला असला तरी त्यांच्या बोलण्यात कितपत सत्य आहे. याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. कारण नामदेव जाधव हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात, अशी टीकाही त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी होत असते.
कोण आहेत प्रा. नामदेव जाधव?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘शिवाजी द मॅनजमेंट गुरु’ नावाचं पुस्तक लिहिल्यानंतर प्रा. नामदेव जाधव चर्चेत आले. लेखक आणि प्रेरणादायी भाषण देणारे वक्ते अशी त्यांची ओळख आहे.