पुणे : पुण्यातील गुरुवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अभिलाषा मित्तल असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, अभिलाषाच्या अंगावर मारहाणीचे वर्ण आढळून आल्याने पोलिसांना वेगळाच संशय आला होता. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसतीगृह चालकाला खडक पोलिसांनी अटक केली आहे.
अभिलाषा ही मूळची वाशिम जिल्ह्यातील असून मागील महिन्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती. सध्या ती शहरातील गुरुवार पेठेतील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. दरम्यान, 7 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास खोलीमध्ये एकटी असताना तिने आतून दरवाजा बंद करुन गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र, अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले होते. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या? यादृष्टीने पोलिस तपास करत होते.
होस्टेल चालकाला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती. तेथील वसतिगृह चालक सुनील परमेश्वर महानोर याने तिला अमानत रक्कम मागितली होती. तसेच तिला मारहाण देखील केली होती. अशी तक्रार तिच्या वडिलांनी खडक पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार सुनील महानोर याला अटक करण्यात आली आहे.
वडिलांना केला होता फोन
होस्टेल चालक महानोर याने अभिलाषाला मारहाण केल्यानंतर ती रडत-रडत खोलीमध्ये गेली होती. त्यानंतर तिने खोलीचा दरवाजा लावून घेतला होता. अभिलाषा हिने तिचे वडील महेंद्र मित्तल यांना हॉस्टेल बदलायचे आहे, असं सांगण्यासाठी फोन देखील केला होता. त्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी अभिलाषाचे वडील महेंद्र मित्तल यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.