पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीलाजनतेचा कौल मिळाला आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. अशातच आता निकाल लागून आठ दिवस उलटून गेले तरी सत्ता स्थापन होऊ शकली नाही. तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? याबाबतही निश्चित झालेलं नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत अनेक नावं चर्चेत येऊ लागली आहेत. सोशल मीडियावर भाजप धक्कातंत्राचा अवलंब करणार असून नुकतेच पुण्यातून लोकसभेवर निवडून गेलेले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व चर्चा निरर्थक असल्याचं खुद्द मंत्री मोहोळ यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाच्या चर्चेवर पडदा पडला आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट करत या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.”
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.
आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
आमच्या…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 29, 2024
दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा न केल्यामुळे आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शहांची भेट घेतल्यामुळे आगामी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मराठा असावा अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यासाठीच मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर आता या चर्चा निरर्थक असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं.