पुणे : माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण असल्याचा उच्चार कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी केला आहे. नुकतीच त्यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी माझा नवरा हा हिंदुत्ववादी होता, त्यामुळेच त्याची हत्या झाली असल्याचा आरोप स्वाती मोहोळ यांनी केला आहे. .तसेच शेवटच्या श्वासापर्यंत आपण हिंदुत्ववादासाठी काम करणार असही शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ म्हणाल्या.
स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या मागे-मागे शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.
शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर 3 दिवसांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली. त्यावेळी स्वाती मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, सरकार आणि प्रशासनावर आपला पूर्ण विश्वास आहे. कायदा आपल्याला न्याय देईल. नवरा हिंदुत्ववादी होता, हिदुत्ववादासाठी काम करत होता म्हणून त्याची हत्या झाली. समोरच्याला जर असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाणार तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार असे स्वाती मोहोळ म्हणाल्या.