भोर (पुणे) : बालवडी (ता. भोर) येथे ज्येष्ठ महिलेच्या अंत्यविधीनंतर अर्धवट जळालेला मृतदेह फेकून मृतदेहाची विटंबना केल्याची घटना रविवारी सांयकाळी घडली होती. या प्रकरणी भोर पोलिसांनी नेरे (ता. भोर) येथील तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश सदुभाऊ बढे असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय विजय किंद्रे (वय ३० रा. बालवडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. विटंबना झाल्याची माहिती मिळताच, मृताच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बढे यांच्या हॉटेलवर हल्ला केला. हल्ल्यात हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले. तर बढे यांना देखील जमावाकडून मारहाण करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालवडी गावातील वृद्ध महिलेचे निधन झाले होते. गावातील अंत्यविधी नेरे गावाजवळच्या ओढ्यात करतात. मात्र, भोर-मांढरदेवी रस्त्यावर नेरे येथे पुलाचे काम सुरू असल्याने आणि रात्र असल्यामुळे बालवडी गावाच्या हद्दीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान, स्मशानभूमीच्या जागेचा वाद सुरू असून, माझ्या हॉटेलसमोर अंत्यविधी का केला, या रागाने प्रकाश सदाशिव बढे (रा. नेरे) याने अर्धवट जळालेला मृतदेह फेकून देत मृतदेहाची विटंबना केली.
या घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, सहायक पोलीस निरीक्षक करपे, चव्हाण, उद्धव गायकवाड, विकास लगस व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून येथील तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी बढे यांना ताब्यात घेतले असून, उपचारासाठी भोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. गावात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी शांत राहण्याचे आवाहन केले आहे.