पुणे : शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी गुरुवारी (ता.१५) दिले आहे.
अजित देवजी गोरीवले (रा. उमराठ गोरीवलेवाडी, ता. गुहागर जि. रत्नागिरी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार ६ मे २०१८ रोजी घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित गोरीवले याने मुंबईवरून पाहुणी म्हणून गावी आलेल्या १५ वर्षांच्या शाळकरी मुलीला गोंधळाच्या कार्यक्रम दाखवण्यासाठी घेऊन जाण्याचा बहाणा केला. त्यानंतर तिला दुचाकीवरून उमराठ येथे नेऊन बलात्कार केला. हा घडलेला प्रकार कोणास सांगितला तर जिवे मारण्याची धमकीही त्याने पीडित मुलीला दिली.
दरम्यान, घरी गेल्यानंतर पीडित मुलीने घडलेल्या प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने थेट गुहागर पोलीस ठाण्यात आरोपी अजित गोरीवले याच्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक समीर शेंडे यांनी करून चिपळूण येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्यासमोर पूर्ण झाली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. सरकारी वकील ठाकूर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी दिले आहेत. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी कोर्ट पैरवी प्रदीप भंडारी यांचे सहकार्य मिळाले.