पुणे : पुण्यात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचे खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली होती. ३० मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिनिक्स मॉलजवळून तिचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस तपासात तरुणीचे अपहरण करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा खून करून मृतदेह सुपा गावाजवळच्या एका शेतात जाळून पुरल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२, रा. स्टँझा लिव्हिंग, प्रिसो हाऊस, सकोरेनगर, विमाननगर) असं खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे तिघेही मराठवड्यातील राहणारे आहेत. शिवम हा रायसोनी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञानाच्या तृतीय वर्षाला शिकतो. तर, जाधव आणि इंदूरे हे त्याचे मित्र आहेत. याप्रकरणी तिचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय ४९, रा. हरंगुळ, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री मुळची लातूर जिल्ह्यातील हरंगूळ गावची रहिवाशी आहे. ती सध्या पुण्यातील वाघोली येथील जी. एस. रायसोनी महाविद्यालयात ‘बीई कॉम्प्युटर्स’चे शिक्षण घेत होती. भाग्यश्री ३० मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास फिनिक्स मॉलमध्ये गेली होती. मॉलमधून बाहेर आल्यानंतर ती शिवम, सागर आणि सुरेश या मित्रांसोबत गेली होती. तिच्या कुटुंबीयांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होत नसल्यामुळे तिच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.
आईच्या मोबाईलवर खंडणी मागणीचा मेसेज
दरम्यान, ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात असून नऊ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल.’ असा मेसेज भाग्यश्रीच्या आईच्या मोबाईलवर आला होता. ही बाब त्यांनी पोलिसांना कळवताच पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने खुनाची कबुली दिली. ज्या दिवशी अपहरण केले त्याच दिवशी तिचा खून करण्यात आला असून सुपा गावाच्या हद्दीत तिचा मृतदेह पुरल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
म्हणून केला भाग्यश्रीचा खून
आरोपी सागर आणि सुरेश हे कर्जबाजारी झालेले होते. त्यामुळे त्यांना पैशांची गरज होती. भाग्यश्रीच्या कुटुंबियांबाबत आरोपींना माहिती होती. त्यांच्याकडून पैसे मिळू शकतात असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी तिचे अपहरण करून खून केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले करत आहेत.