पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रायकर मळा येथे जागेच्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने वार करुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी २० फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे (वय-१९ रा. खंडोबाचा मळा, रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी मृत आदित्य याच्या नातेवाईकांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आदित्यचे नातेवाईक संपत तानाजी काळोखे व सागर पोपट रायकर यांच्यावर सिहंगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाले असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आदित्य आणि त्याचे मारेकरी संपत काळोखे हे नातेवाईक असून त्यांच्यामध्ये जागेवरून वाद सुरु आहेत. दरम्यान मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता या वादग्रस्त जागेवर आदित्य कामगारांसह पत्रा शेडचे काम करत होता. त्यावेळी आरोपी संपत काळोखे व सागर रायकर हे त्या ठिकाणी आले. यावेळी आदित्य आणि संपत यांच्यात वाद सुरु झाले. त्यानंतर दोघांनी आदित्यच्या पाठीत धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले.
या घटनेत आदित्यचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला आहे.. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.