पुणे : गणवडी गावाजवळ पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता. २१) एका अनोळखी व्यक्तीचा खून करुन मृतदेह फेकल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील चार आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने अटक केली आहे. मृत व्यक्ती मुंबई येथील रहिवासी असून आरोपींनी मुंबई येथे जाऊन त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुणे-कोलाड रोडलगत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, झो मॅन्युअल परेरा (रा. कलिना, मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक महादेव थोरात (वय ३५, रा. वारजे, मुळ रा. मु.पो. पारुडी, ता. आष्टी जि. बीड), गणेश साहेबराव रहाटे (वय ३५, रा. अप्पर, पुणे, मुळ रा. मु.पो. सावळी बुद्रुक, ता. अकोले, जि. अमरावती), धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके (वय ४०, रा. भवानी पेठ), योगेश दत्तू माने (वय ४२, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, अपहरण, खंडणी, मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक मोहनदास जाधव यांना माहिती मिळाली की, पुणयातून कलिना मुंबई येथे जाऊन काही जणांनी झो मॅन्युअल परेरा याचा खून करुन मृतदेह मुळशी परिसरात टाकला. मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाची दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेऊन आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता झो परेरा हा योगेश माने याच्या मेहुणीसोबत लीव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत होता. माने याची मेहुणी आणि परेरा यांच्यात वाद झाले होते.
आरोपींनी बुधवारी (ता. २०) याच कारणावरुन परेरा राहत असलेल्या कलिना येथील घरात शिरुन त्याला बोथट हत्याराने मारहाण केली. तसेच त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर गाडीत टाकून पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह मुळशी परिसरात झुडपात टाकून दिल्याचे आरोपींनी सांगितले.