पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर होताच पक्षांतर्गत नेत्यांच्या भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची घरी भेट घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. या भेटींना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढत असल्याचे चित्र आहे. शिवाय या भेटींदरम्यान मोहोळ यांचा विजय मताधिक्याचा उच्चांक गाठेल, असा विश्वास राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवाराची घोषणा केल्याने प्रचाराला लागलीच सुरुवात झाली आहे. मोहोळ यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पक्षांतंर्गत भेटीगाठींना प्राधान्य दिल्याने संघटना पातळीवर सर्वच घटक कार्यरत करण्याचा मोहोळ यांचा प्रयत्न आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सर्वप्रथम त्यांचे राजकीय गुरु असलेले माजी खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेत संवाद साधला. याशिवाय शिवाजीनगरचे माजी आमदार विजय काळे यांच्याशीही मोहोळ यांनी चर्चा केली.
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्याही घरी मोहोळ यांनी भेट देत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी कुलकर्णी यांनी मोहोळ यांचे औक्षण करत विजयाचा निश्चय केला. तसेच शहर भाजपचे माजी अध्यक्ष योगेश गोगावले यांचीही भेट मोहोळ यांनी घेऊन त्यांनाही प्रचारात सक्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे.
भेटींबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले,भाजप ही केवळ पार्टीच नाही तर एक परिवार आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्या परिवारातील घटकांशी संवाद आणि भेटी आवश्यक असतात. शिवाय या निमित्ताने जुन्या आठवणींनाही उजाळा मिळतो. या सर्वांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हा माझ्या प्रचाराचा उत्साह वाढवणारा ठरणार आहे.
मोहोळ विक्रमी मतांनी विजयी होतील : मेधा कुलकर्णी
मोहोळ यांचा विजय निश्चित असून त्यांचा हा विजय आजवर मिळालेल्या विजयांपेक्षा अधिक मतांचा असेल, असा विश्वास खा. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता अधिकच्या मताधिक्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. मोहोळ यांच्याशी प्रचाराच्या रणनितीसंदर्भातही बोलणे झाले आहे, असेही खा. कुलकर्णी म्हणाल्या.