पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचारासाठी उमेदवार आणि विविध राजकीय पक्षांकडून सशुल्क जाहिराती सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. मात्र, सशुल्क जाहिरात करण्यापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीमार्फत (एमसीएमसी) जाहिरातींचे पूर्वप्रमाणीरकण करुन घेणे आवश्यक आहे. पूर्वप्रमाणीरकण न करणाऱ्या सात जणांना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बाजवली आहे. यामध्ये भाजपच्या एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सशुल्क जाहिरात करता येत नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ६ जणांची टीम तयार केली आहे. यामध्ये तीन जण सायबर पोलीस, एक सोशल मिडिया तज्ज्ञ आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
हे अधिकारी सोशल मीडियावर सशुल्क केल्या जाणाऱ्या जाहिरातींचे अवलोकन करून त्या जाहिराती एखादा उमेदवार किंवा पक्षाला फायदा व्हावा, यासाठी केल्या असतील, तर त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जाते. दरम्यान, आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील सात जणांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मुरलीधर मोहोळ यांचा सोशल मिडीयावर प्रचार
भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा देखील यामध्ये समावेश आहे. बालवडकर यांनी फेसबुक पेजवरून आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाने नोटीस पाठविली आहे.