पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करताना आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने पुणे शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. पोलीस तपासात या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस येत आहेत.
शरद मोहोळला संपवण्यामागे आर्थिक आणि जमिनींचे व्यवहार हे कारण असल्याचं समोर आलं होतं. मात्र आता गँगवारमधून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. अशातच आता आरोपीने मोहोळवर गोळीबार करताना गुंडाच्या नावाने घोषणा का दिल्या, तसेच संबंधित गुंड मोहोळ खून प्रकरणात सामील आहे का? यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
शरद मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडताना मुन्ना पोळेकरने पुण्यातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या खून प्रकरणात तो गुंड सामील आहे का? त्याने पोळेकरला सुपारी दिली का? यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात मोहाेळचा खून जमिनीचा वादातून झाल्याची माहिती मिळाली होती. पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांनी मोहळचा खून करण्यासाठी कट रचल्याचे देखील समोर आले आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणात आत्तापर्यंत साहील उर्फ मुन्ना पोळेकर, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी ५ जानेवारी शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा परिसरातून तो निघाला होता. त्यावेळी आधीच एक आरोपी दबा धरून बसला होता. शरदमोहोळ बाहेर पडताच मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी मोहोळवर बेछुट गोळीबार केला. मोहोळचा खून झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.