पुणे : गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळण्यास अडचण येते आहे. हे पाहून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांना आपापल्या शहरात नाट्यगृहांप्रमाणेच मल्टीप्लेक्स उभारण्याची मागणी केली आहे. तसेच नाट्यगृहांमध्ये स्क्रीन व प्रोजेक्टरची सोय करून दिवसाला 2 वेळा मराठी चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करावी असेही पुढे म्हटले आहे.
चांगले मराठी चित्रपट निघाले आणि त्यांना थिएटर्स किंवा प्रेक्षक मिळाले नाही तर उपयोग काय? असा सवाल उपस्थित करून मेघराज राजे भोसले यांनी शासन किंवा महानगर पालिकांनी या गोष्टीत पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे. याशिवाय मराठी प्रेक्षकांनीही मराठी चित्रपट थिएटर्समध्ये बघायचे असा संकल्प केल्यास मराठी चित्रपटसृष्टीला आधार मिळेल असे मेघराज राजे भोसले म्हणाले.
महाराष्ट्रातले अनेक मराठी तरुण-तरुणी चित्रपट निर्मिती, अभिनय, दिग्दर्शन, पटकथा, संवाद लेखन, सिनेमॅटोग्रॅफी याकडे वळत आहेत. जागतिक मराठी स्पर्धात्मक विभाग असणारे महाराष्ट्र शासनाचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखे आंतरराष्ट्रीय व्यासपीठही आता उपलब्ध करत आहे. मराठी चित्रपटसृष्टीला अधिक बहर येण्यासाठी शासन किंवा महानगरपालिकांनी नाट्यगृहांप्रमाणेच मल्टीप्लेक्सही उभारल्यास, मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत ही अडचण कायमची दूर होईल. असा विश्वास मेघराज राजे भोसले यांनी व्यक्त केला.
मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठी 5 लाख रुपयांचा ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम’सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार देत असते. तसेच अ. भा. मराठी चित्रपट महामंडळातर्फे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद लेखन आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्रॅफी यांना प्रत्येकी 25 हजार रुपये असे पुरस्कार दिले जातात. यामुळे सर्वोत्कृष्ट काम देण्याचा मराठी चित्रपटसृष्टीत प्रयत्न आहे ही बाब त्यांनी यावेळी मांडली.