पुणे : शेजाऱ्यांशी वाद घालणे येरवडा येथील एकाला चांगलेच महागात पडले आहे. आदल्या रात्री महापालिकेची नोटीस आणि दुसऱ्या दिवशी घर पाडल्याची घटना पुण्यात घडली आहे. येरवडा येथील गणेश नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली. महापालिकेने कारवाई करताना घरातील सामानसुद्धा बाहेर काढण्यासाठी वेळ दिला नाही. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास कारवाई केली. यात रांका यांच्या घराच्या दोन खोल्यांचे छत पूर्णपणे पाडून टाकले. त्यामध्ये घरातील सामानाचे नुकसान झाले.
येरवडा येथील गणेश नगरमध्ये पारसदास पासरदास रांका यांचे घर आहे. त्यांचे शेजारच्या दोन कुटुंबांसोबत २०१६ पासून वाद सुरु होते. त्यापैकी एकाने रांका यांच्या घराचे अनधिकृत बांधकाम असल्याचे महापालिकेत तक्रारी केली होती. त्यानंतर या तक्रारदाराने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. त्यामध्ये झालेल्या सुनावणीत आयोगाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने येथील चार घरांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये रांका यांच्या घराचाही समावेश होता.
पासरदास रांका म्हणाले, ‘गेल्या १५ वर्षापासून या ठिकाणी मी राहात आहे, या भागात अनेक अनधिकृत घरे आहेत. माझी कोणाबद्दलच तक्रार नव्हती. नातेवाईक वारल्याने मी राजस्थानला निघालो होतो, पण मी घरी नसताना पत्नीला रात्री साडेबाराला पोलिसांनांकडून कारवाईची नोटीस मिळाली. सकाळी लगेच महापालिकेने माझे घर महापालिकेने उध्वस्त करून टाकले. घरातील सामान देखील बाजूला काढू दिले नाही. इतरांवर अगदी किरकोळ कारवाई केली आहे, असा आरोप पासरदास रांका यांनी केला आहे.
गणेशनगरमध्ये २०१६ पासून शेजाऱ्यांमध्ये भांडणे सुरु होते, त्यात अनेकदा तक्रारी झालेल्या आहेत. तक्रारदाराने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई केली. तसेच रांका यांनी जिल्हा न्यायालयात या नोटिसीविरोधात याचिका दाखल केली आहे, पण त्यावर स्थगिती नसल्याने कारवाई झाली. रांका यांच्या घरावर मुद्दाम जास्त कारवाई केलेली नाही.’ असे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तुळशीराम नागटिळक यांनी म्हटले.