पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाईन शॉप फोडून दुकानातील विदेशी दारूच्या बाटल्या व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चार आरोपींनी 27 डिसेंबर रोजी केशवनगर येथील विरांश वाईन्समध्ये चोरी करुन रोकड व विदेशी दारुच्या बाटल्यांचे बॉक्स असा एकूण 4 लाख 60 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेले होते. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अरबाज मुनीर शेख (वय-19 रा. खडकी बाजार, गोपी चाळ, खडकी), ओंकार उर्फ पल्या सुधाकर परमवार (वय-24 रा. जुना बाजार, नवी तालीम समोर, खडकी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विरांश वाईन्स दुकानामधील मॅनेजर सुरेश कचरुलाल देवतवाल (वय-56 झेड कॉर्नर, मांजरी बु.) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भादवि कलम 380, 454, 457 नुसार गुन्हा दाखल केला.
त्यानंतर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. दोन्ही पथकांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला जात होता. पथकांनी 15 दिवसांत 250 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपास सुरु असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन पाटील, स्वप्नील रासकर यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी खडकी परिसरात येणार आहेत.
त्यानुसार पथकाने सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे शहरातील दत्तवाडी, खडकी, दिघी, लष्कर, येरवडा, फरासखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 23 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून 33 हजार 600 रुपये किंमतीच्या विदेशी दारुचे बॉक्स जप्त केले आहेत. आरोपींकडे रोख रक्कमेबाबत चौकशी सुरु आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 एस राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्वीनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिता रोकडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, पोलीस शिपाई स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.