पुणे : अटल सेतूमुळे मुंबईतून नवी मुंबई अवघ्या 20 मिनिटांत गाठता येते. तासाभराचा प्रवास मिनिटांतच शक्य झाल्यामुळे या सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. एकीकडे मुंबईच्या बेस्ट बससाठी हा मार्ग खुला करण्याची चाचपणी सुरू असतानाच, मुंबई-पुणे एसटी (शिवनेरी) सुरू करण्याचा विचार ही एसटी महामंडळाच्या दृष्टीक्षेपात असल्याची माहिती समोर येत आहे.
अटल सेतूवरून शिवनेरी बसचा प्रवास शक्य आहे. मात्र, त्यासाठी एका प्राथमिक अटीची पूर्तता होणे गरजेचे आहे. ती अट पूर्ण झाल्यास हा प्रवास शक्य असल्यामुळे मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्या मंडळींसाठी ही आनंदाची बातमी आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही.
कोणती आहे अट?
मुंबईतूनच बस निघताना त्यामध्ये 45 प्रवासी असले पाहीजेत. 45 प्रवासी असल्यास अटल सेतूवरून ती सहज पुणे गाठू शकते. मुंबई आणि पुण्यातील अंतर कमी करत प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अटल सेतूवरून एसटी चालवण्याचा विचार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. किंबहुना एसटी महामंडळाने त्यासाठीचं सर्वेक्षण ही केलं आहे.
प्राथमिक स्तरावर मुंबई-पुणे प्रत्येकी तीन फेऱ्यांमागे एक फेरी अटल सेतूवरून चालवण्याचे नियोजन आहे. शिवनेरीच्या काही फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर दादर- शिवडी-अटल सेतू-उलवे-पनवेल -पुणे चालवल्या जाऊ शकतात अशी माहितीही सध्या समोर येत आहे. दरम्यान, येत्या काळात बेस्ट बस सोबतच नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे चालवण्यात येणारी बस सुविधाही अटल सेतू मार्गाने पुढे नेण्याचा विचार सुरु आहे. तेव्हा अटल सेतू शहरातील दळणवळणामध्ये मोठा हातभार लावताना दिसणार आहे.