पुणे : पुण्याहून आज सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्वीन लोणावळा रेल्वे स्थानकात तब्बल २० मिनिटे संतप्त आंदोलकांनी रोखून धरली. लोणावळ्यात लोकलच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात तसेच एक्सप्रेस गाड्यांसाठी लोणावळा रेल्वे स्थानकात थांबा करावा, या प्रमुख मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.
आंदोलक रेल्वे रूळावर उतरले होते. डेक्कन क्वीनच्या समोरून आंदोलक बाजूला होत नसल्याने रेल्वे पोलीस आणि लोणावळा पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. या दरम्यान पोलीस आणि आंदोलक समोरासमोर आले होते.
यापूर्वी कोरोना काळात पुणे ते लोणावळा तसेच लोणावळा ते पुणे या लोहमार्गावर लोकल फेऱ्या योग्य रीतीने सुरू होत्या. परंतु, करोना काळानंतर सकाळी दहा ते दुपारी तीनच्या दरम्यान पुण्याच्या दिशेने एकही लोकल नसल्याने शालेय विद्यार्थी, व्यापारी, पर्यटकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. तासनतास लोणावळा रेल्वे स्थानकात बसावे लागत असल्याने अखेर सर्वपक्षीय आणि लोणावळा ग्रामस्थ, मावळ ग्रामस्थ यांनी आज सकाळी रेल रोको आंदोलन केले.
या आंदोलनप्रसंगी रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. रेल्वे पोलिसांकडून स्थानिकांना रोखण्यात आले. मात्र, तरी देखील स्थानिकांनी रुळावर उतरून डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. दरम्यान, मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आंदोलक पोलिसांचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांना बळजबरीने आंदोलकांना बाजूला करावे लागले. रेल्वे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढल्यानंतर डेक्कन क्वीन एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली.