Mumbai News : मुंबई : जागर पदयात्रा अत्यंत संयमाने काढली आहे. हा इशारा आहे नाहीतर पुढे मनसे आक्रमक होईल. मग आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी दिला आहे. तुम्ही कितीही केसेस करा काहीही करा, पण या महामार्गासाठी आम्ही आक्रमक राहणार आहोत, असंही अमित ठाकरे म्हणाले.
‘चंद्रावर जास्त खड्डे की मुंबई-गोवा महामार्गावर
मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून रखडलेलं आहे. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमित ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. 17 वर्षांनंतरही मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी का लागत नाही? असा प्रश्न अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मनसेच्या या पदयात्रेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले.
अमित ठाकरे यावेळी पुढे म्हणाले, ‘चंद्रावर जास्त खड्डे की मुंबई-गोवा महामार्गावर ते तुम्हीच येऊन पाहा. या महामार्गाच्या कामात 15 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. हे एवढे पैसे गेले कुठे? आम्ही इशारा देतोय की, यावेळी अत्यंत संयमाने ही जागर पदयात्रा काढली आहे, हा इशारा आहे’.