लोणी काळभोर : गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे. तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात पावसाने कहर घातल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातच गुरुवारी (ता.25) पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुळा-मुठा नदीला पूर आला आहे. या नदीचे बॅक वॉटर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात घुसून थेट रेल्वे पुलाला धडकले आहे. त्यामुळे या शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी अडकले होते. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर जेसीबी, ट्रॅक्टर व होडीच्या सहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे विद्यार्थी गुरुवारी सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास शाळेत गेले होते. विद्यार्थ्यांचे वर्गात तास सुरु झाले होते. यातच पावसाने जोर वाढविला होता. तर मुळशी धरणाचे 11 दरवाजे खुले करण्यात आले होते. त्यामुळे मुळा-मुठा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. मुळा-मुठा नदी दुथडी भरून वाहत होती.
मुळा-मुठा नदीला पूर आल्याने तिचे बॅक वॉटरचे पाणी एमआयटीत घुसण्यास सुरुवात झाली. बघता बघता पाणी सगळीकडे पसरले आणि ते थेट रेल्वे पुलापर्यंत पोहचले. एमआयटीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने हजारो विद्यार्थी अडकले. तर रामाकृषी रसायन कंपनीकडे जाणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे राहिंज वस्ती व रामाकृषी कंपनीचा काही काळ संपर्क तुटला होता. लोणी काळभोर येथील मालधक्क्याकडून येणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.
दरम्यान, मुसळधार पाऊस कधी थांबेल व आपली यातून कधी सुटका होईल, याची वाट विद्यार्थी अडकलेल्या ठिकाणी पाहत होते. तर विद्यार्थी कधी बाहेर येथील याची वाट पालक एमआयटीच्या गेटसमोर पाहत होते. पुराच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी जवळजवळ चार तास अडकले होते. तर लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एमआयटीच्या दिशेने जाणारा रस्ता बंद केला होता.
विद्यार्थ्यांची सुटका
या पुराचा मोठा फटका एमआयटीतील शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थी पुराच्या पाण्यामुळे तब्बल 4 तास अडकले होते. यावेळी निरागस विद्यार्थ्यांना आपली यामधून कधी सुटका होईल, अशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. पावसाचा कहर कमी झाल्यानंतर एमआयटी प्रशासनाने पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना जेसीबी, ट्रॅक्टर व होडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. सुटका झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. तर आपला मुलगा ताब्यात आल्यानंतर पालकांच्या जीवात जीव आला.
20 वर्षांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा
एमआयटी या शैक्षणिक संकुलनाचे उद्धाटन 20 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर, प्रसिध्द मराठी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, विद्यमान खासदार सुनेत्रा पवार व अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळीसुद्धा मुळा-मुठा नदीला पूर आल्याने सर्वजण नदीच्या बॅक वॉटरमध्ये अडकले होते. त्यांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या पुराचीच प्रचीती लोणी काळभोरकरांना आज आली आहे. त्यामुळे 20 वर्षांपूर्वीच्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे वरातीमागून घोडे
पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पोहोचण्याअगोदरच विद्यार्थी शाळेत पोहचले होते. विद्यार्थ्यांना माघारी परत पाठवायचे म्हटले, तर बाहेर पावसाने चांगला जोर धरला होता. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची चांगलीच धांदल उडाली होती. विद्यार्थ्यांना पावसात भिजत घरी जावे लागले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे वरातीमागून घोडे अशी म्हणण्याची वेळ पालकांवर आली.