पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सुरुवातीला इंग्रजीतूनच अर्ज भरण्याची सक्ती करण्यात आली होती. जर मराठीत अर्ज केला असेल, तर तो बाद करण्यात येत होता. अर्जाच्या छाननीला सुरुवात झाली असून यामध्ये आता मराठीतील अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला. पुणे जिल्ह्यात जवळपास १२ लाखांच्या दरम्यान महिलांनी अर्ज केले आहेत.
योजना जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आला. परंतु, अर्ज इंग्रजीत भरण्याचा उल्लेख नव्हता. योजना जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांसाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे आर्थिक लूट होण्याचे प्रकारही समोर आले. त्यानंतर जाग आलेल्या शासनाने कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली.
ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी आल्यानंतर अनेकांनी रात्रभर जागून अर्ज भरले. पुणे जिल्ह्यात मंगळवारपासून अर्जाच्या छाननीला सुरुवात झाली. प्रत्येक तालुक्यामध्ये छाननी करण्यात येणार असून, तालुकास्तरावर छाननी कक्ष सुरू केले आहेत. त्यासाठी सकाळी सात ते रात्री बारापर्यंत “अधिकारी, कर्मचारी छाननीचे काम करत आहेत. प्रत्येकाला शिफ्टमध्ये कामाची जबाबदारी दिली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १२ लाख अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
याबाबत जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले की, अर्जछाननीला सुरुवात झाली आहे. मराठीत केलेला अर्ज अंशतः नाकारला जात होता. मात्र, आता मराठीतून भरलेला अर्जही छाननीमध्ये स्वीकारला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये