लोणी काळभोर : थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे ‘गरिबांचा फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाचे आगमन लोणी काळभोर (ता. हवेली) येथील आठवडे बाजारात आज शनिवारी (ता.१६) झाले.
उरुळी कांचन, कुंजीरवाडी व लोणी काळभोरमध्ये लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे. माठ खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली आहे.
लोणी काळभोर येथील आठवडे बाजारात मातीचे माठ हे १५० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. उन्हामध्ये वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कमी किंमतीमध्ये उन्हाळ्यात तहान भागवली जाते म्हणून आज फ्रीजच्या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळेच महत्व आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर काही विक्रेते हातगाडीवर फिरून विक्री करतात. तर काही विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यांच्याजवळ ग्राहकांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगबेरंगी माठ आहेत. माठामध्ये देखील बदल करुन त्यास तोटी, झाकण हे वेगळे बनवून ग्राहकांना आकर्षित करेल, असे माठ उपलब्ध आहेत.
दरम्यान, सद्य:स्थितीत कच्च्या मालाचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच तयार केलेले माठ शेकण्यासाठी लागणारे लाकूड चढ्या दराने विकत घ्यावे लागत आहे. माठ बनवण्यासाठी करावी लागणारी मेहनत व खर्च पाहता आता व्यावसायिक दृष्टिकोनातून माठ बनविणे आज परवडण्यासारखे नाही. यामुळेच माठांचे भाव दुपटीने वाढलेले आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी उद्योग करावाचा लागतो
लोणी काळभोर परिसरात हातगाडीवर फिरून माठ विक्री करतो. पण माठ खरेदी करताना ग्राहक काहीही भाव करतात. सांगितलेल्या दरापेक्षा निम्म्या दरात माठ खरेदी करण्याची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. मात्र, पर्याय नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी हा पारंपरिक उद्योग आम्हाला करावाच लागत आहे.
– सोपान कुंभार, माठ विक्रेता, लोणी काळभोर
माठ बनविण्याचे साहित्य अत्यंत महाग
माठ बनविणे हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. लोणी काळभोरमध्ये आमचा माठ बनविण्याचा कारखाना आहे. माठ बनविण्याचे साहित्य अत्यंत महाग झाले आहे. त्यामुळे माठ बनवणेही कठीण झाले आहे. मात्र, तरीही आम्ही ग्राहकांना परवडतील असेच दर ठेवलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांनीही भाव न करता सहकार्य करावे.
– दत्तात्रय कुंभार, माठ व्यावसायिक, लोणी काळभोर, ता. हवेली
माठातील पाण्याची चवच न्यारी
उन्हाळ्यात थंड पाण्याची मागणी असते. पण फ्रीजमधल्या पाण्यात ती चव नाही. ती चव मातीच्या माठातील पाण्याला आहे. त्यामुळे घरी फ्रीज असूनही माठाची खरेदी केली आहे आणि मठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
– स्मिता जगताप, गृहिणी, लोणी काळभोर, ता. हवेली.