पुणे : महादेव बेटिंग ॲपप्रकरणात बड्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली होती. पोलिसांनी नारायणगाव येथील तीन मजली इमारतीत धाड टाकून 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करत एका मोठ्या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींनाही ताब्यात घेतले होते.
तर, जवळपास 90 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता याप्रकरणी भाजप ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विराज ढोबळे असं अटक करण्यात आलेल्या वाशिम भाजप ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. 13 जूनच्या रात्री वाशीम येथून त्याला अटक करण्यात आली आहे.
देशभरात चर्चेत असलेल्या महादेव बेटिंग ॲपप्रकरणात सेलिब्रिटी सह बड्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांकडून बारकाईने याप्रकरणाचा तपास होत आहे. त्यातूनच महादेव बेटींग ॲप किती खोलपर्यंत पोहोचलं आहे, याचा अंदाज येईल. कारण, राज्यात नव्हे तर देश विदेशात पोहोचलेलं महादेव बेटींग ॲपचं कनेक्शन आता थेट विदर्भातील वाशिम जिल्ह्यापर्यंत पोहोचलं असल्याचे उघड झाले आहे.
वाशिमच्या बाभूळगाव इथं राहणाऱ्या सामान्य कुटुंबातील युवकाचं राहणीमान आणि रुबाब सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. चारचाकी गाड्यांतून वावरणने, तसेच व्हीआयपी राहणीमान हा चर्चेचा विषय बनला होता. तर भाजप ओबीसी युवा मोर्चा पदाधिकारी विराज ढोबळे पुणे इथं राहत असे. मात्र, 13 जून रोजी रात्री वाशिम शहरात दाखल होताच वाशिम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याकडे एक धारदार शस्त्र सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, विराजला अटक केल्याने महादेव बेटिंग ॲप प्रकरणाशी वाशिमचे काय कनेक्शन आहे, आणि नेमका त्याचा काय संबंध आहे याची चौकशी पोलिसांकडून होत आहे. तसेच, महादेव बेटींग ॲपप्रकरणात आणखी काही लोक वाशिम किंवा विदर्भातील आहेत का, असा प्रश्न आता चर्चेत आणि पोलिसांच्या तपासात दिसून येत आहे.