पुणे : महावितरण कंपणीने पुणे विभागातील विज थकबाकीदारांच्या विरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. वारंवार आवाहन करूनही एक हजार रुपये अथवा त्यापेक्षा जादा थकबाकी न भरलेल्या तब्बल 30,217 अकृषिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा मागील कांही दिवसात महावितरणने खंडित केला आहे.
महावितरण कंपणीने पुणे विभागातील विज थकबाकीदारांच्या विरोधातातील विज खंडीत करण्याची कारवाई यापुढील काळात आनखी तिव्र करण्याचा इशारा विज ग्राहकांना दिला असुन, ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी वेळेत भरून आपल्यावर होणारी कटू कारवाई टाळावी असे महावितरण तर्फे आवाहन करण्यात आले आहे
पुणे प्रादेशिक विभागातील पुणे जिल्ह्यात 7 लाख 80 हजार 611 ग्राहकांकडे सुमारे 200 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी आहे. 6,79,378 घरगुती ग्राहकांकडे 134 कोटी 34 लाख, 79,418 वाणिज्यिक ग्राहकांकडे 45 कोटी 12 लाख रुपये आणि 11815 औद्योगिक ग्राहकांकडे 20 कोटी 79 लाख रुपयांची थकबाकी आहे. रक्कम कितीही असली तरी एका महिन्याचे वीजबिल थकल्यास नियमानुसार वीजपुरवठा खंडित केला जातो. थकबाकी त्वरित भरावी आणि वीजपुरवठा खंडित केला जाण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहेत.
महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक हजार अथवा त्यापेक्षा जादा थकीत विज बिल असणारे साडेसात हजाराहुन अधिक ग्राहक उरुळी कांचन उपविभागात आहेत. त्यांच्याकडे 2 कोटी 94 लक्ष 80 हजार रुपयांची थकबाकी आहे. संबधित ग्राहकांना वारंवार विनंती करुनही, ग्राहक हवा तसा प्रतीसाद देत नसल्याचे पुढे आले आहे. अशा ग्राहकांचा विज पुरवठा कोणत्याही क्षणी खंडीत करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
मागील कांही दिवसात अडीच हजार ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी भरुन, आम्हाला सहकार्य केलेले आहे. तर वारंवार विनंती करुनही, विज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या हजारहुन अधिक ग्राहकांचा विज पुरवठा मागील आठवड्याच्या काळात खंडीत केलेला आहे. यामुळे ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन, संबंधित अधिकाऱ्याने केले आहे.
दरम्यान, चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे म्हणून जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवारी (दि.26) व रविवारी (दि.27) कार्यालयीन वेळेत सुरू राहतील. www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन भरणा करता येणार आहे.