पिंपरी : पिंपरी-चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर एकहाती भाजपची सत्ता आली, आणि अजितदादांच्या नेत्रुत्वाला सुरूंग लागला. आता महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न सुरू केल्याने भाजपच्या गोठात अस्वस्थता वाढली आहे. भोसरीतील चुकीच्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याचे जाहीर केल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. पिंपरी-चिंचवडकडे कायम लक्ष ठेवावे, अशी मागणी लांडगे यांनी चक्क परमेश्वराकडे केली आहे. या मागणीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांचा बालेकिल्ला उध्वस्त केला आणि महापालिकेवर एकहाती भाजपची सत्ता आणली. आता अजित पवार हे भाजपसोबत आले. उपमुख्यमंत्री होताच पवारांनी महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत भोसरीत महापालिकेने केलेल्या खर्चावरून प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. चुकीच्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आमदार लांडगे हे अस्वस्थ असल्याचे दिसून आले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणातील लक्ष कमी केल्याचे दिसते. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेला आमदार लांडगे यांनी मोकळी वाट करून दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शहराचा विकास झाला. त्यांनी यापुढेही पिंपरी-चिंचवडकडे लक्ष कायम ठेवावे, अशी मागणी परमेश्वराकडे करतो, असे म्हणत आमदार महेंद्र लांडगे यांनी शहरात पूर्वीप्रमाणे लक्ष घालण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कामाचे उद्घाटन, भूमिपूजन झाले. परंतु, आमदार महेश लांडगे यांच्या विरोधामुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच उद्घाटन करण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे भोसरीतील उद्घाटने झाली नव्हती. पवारांसोबतच्या कार्यक्रमाला येणेही आमदार लांडगे यांनी टाळले होते. अखेर शनिवारी फडणवीस यांच्या हस्ते भोसरीतील प्रकल्पाचे उद्घाटन, भूमीपूजने झाली. परंतू, कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणे टाळले. त्यामुळे पवार यांनी भोसरीत प्रवेश नसल्याची चर्चा सुरू झाली.
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन करण्यासाठी आमदार महेश लांडगे सातत्याने पाठपुरावा करत होते. काही दिवसांपूर्वी मी एकदा तारीख दिली. पण, रद्द केली. त्यामुळे ते नाराज झाले. मी नक्की येणार असा शब्द त्यांना दिला होता. ते आमच्यासोबत भावनेने जुळले आहेत. त्यामुळे दोन कार्यक्रम कमी झाले तरी चालतील पण आमदार लांडगे यांचा कार्यक्रम केलाच पाहिजे, असे मी माझ्या कार्यालयातील लोकांना सांगितले. भविष्यातही आमदार लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणेने उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.