केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील खोर येथील रोहिणी माने या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये पहिल्याच प्रयत्नात राज्यांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये 10 वा क्रमांक पटकावत फौजदार पदाला गवसणी घातली आहे.
खोर गावामध्ये फौजदार पदाला गवसणी घालणारी रोहिणी ही पहिली अधिकारी ठरली आहे. त्यामुळे तिचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी दौंड चे आमदार राहुल कुल हे स्वतः उपस्थितीत होते. खोर परिसरातील पहिलीच महिला अधिकारी असल्याने सर्व ग्रामस्थ तसेच अबाल वृद्धांनी गुलालाची उधळण करत मिरवणुकीत ठेका धरला होता.
रोहिणी माने यांच्या आई संगीता माने यांनी अपरिहार्य कारणास्तव रोहीणी पाच वर्षाची असतानाच खोर येथे मामा लहू गायकवाड यांच्या घरी खोर गावी राहण्याचा निर्णय घेतला. मामा लहू गायकवाड व आजोबा विठ्ठल गायकवाड यांनी आई संगिता, भाऊ गणेश माने व रोहिणी यांचा आजतागायत सांभाळ केला.
दहावीपर्यंतचे शिक्षण खोर मधील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर वरवंड येथील श्री गोपीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी शिक्षण घेतले. श्री एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुटुंबाला आधार मिळावा म्हणून पुणे हडपसर येथे 2 वर्षे एका खाजगी कंपनीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नोकरी करताना स्पर्धा परीक्षा दिली. हडपसर येथील सह्याद्री अकॅडमीचे ॲड सोपान पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. सन 2022-23 च्या घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत रोहिणी नेत्रदीपक यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
रोहिणीच्या यशाबद्दल कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. खोर ग्रामस्थांच्या वतीने रोहिणीची जंगी मिरवणूक काढण्यात आली तसेच नागरी सत्कार देखील करण्यात आला. यावेळी परिसरातील सर्व राजकिय, सामजिक, सांस्कृतिक शेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थ महिला भगिनी उपास्थित होते.