पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एमपीएससी करणारा एक विद्यार्थी गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता झाला आहे. मंत्रालयात नोकरी लागल्याचे पालकांना खोटे सांगून हा तरुण गायब झाला आहे. बुद्धभूषण पठारे (वय २४) असे या बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात बुद्धभूषणच्या आई-वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुद्धभूषण पठारे मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यातील रहिवाशी आहे. गेल्या ४ वर्षांपासून पुण्यातील गांजवे चौक परिसरातील एका इमारतीत तो आपल्या मित्रांसोबत रहात एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. तसेच नवी पेठेतील अभ्यासिकेत तो अभ्यास करायचा.
दरम्यान, मे महिन्यात त्याने आपल्या आई-वडिलांना मंत्रालयात नोकरी लागल्याचे सांगितले. मुलाला नोकरी लागल्याचे ऐकून आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला. मुलाला शुभेच्छा देण्यासाठी आणि भेटण्यासाठी त्याच्या पालकांनी थेट मुंबई गाठली. मात्र तिथे त्यांना आपला मुलगाच भेटला नाही. त्याचा मोबाईल बंद लागला. त्यानंतर त्यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
काही दिवसांपूर्वी मात्र अचानक त्याच्या मोबाईलवरून त्याच्या पालकांना एक व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. त्यामध्ये मी सध्या डिप्रेशनमध्ये आहे, असा उल्लेख ककरण्यात आला आहे. त्यामुळे बुद्धभूषण पठारे नेमका गेला कुठे? कोणाच्या संपर्कात आहे का? त्याचे कोणाशी काही वाद झाले का? तसेच त्याच्याशी कोणी आर्थिक व्यवहार केले का? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.