Supriya Sule :इंदापूर : इंदापूर शहरातील सामाजिक, सार्वजनिक समस्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे आणि त्यांचे सहकारी गेल्या २३५ दिवसांपासून इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणात धरणे आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान, ताटे यांनी शनिवारी (ता. २५) खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर इंदापूर शहरातील नागरी समस्यांचा पाढा वाचला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. नगरपरिषद बेकायदेशीर कराच्या माध्यमातून इंदापूरकरांची पिळवणूक करत असेल, तर गय केली जाणार नाही. गरज पडल्यास मी नगरपरिषदेसमोर उपोषणास बसेन, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. इंदापूरकरांच्या विविध प्रश्नांसाठी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला सविस्तर निवेदन दिले असून, या प्रश्नांचा मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टीची व्याजआकारणी, घरकुलाचा प्रश्न, जोतिबा मंदिराशेजारील घनकचरा डेपोचा प्रश्न, तरंगवाडी तलावावरील बंद केलेला पाणीपुरवठा, वेंकटेशनगरमधील नागरिकांच्या घरासंबंधीचे प्रश्न, इंदापूर शहराला उजनीतून होणारा अस्वच्छ पाणीपुरवठा, गाळेधारकांवर होणारा अन्याय, ६०० चौरस फुटांच्या आतील घरांना लावलेला शास्तीकर आणि दंड तातडीने कमी करणे, सन २०१७-१८ च्या सर्वेक्षणामध्ये घरांची चुकीची झालेली मोजमापे तातडीने दुरुस्त करणे या मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर इंदापूर नागरी संघर्ष समितीचे २३५ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. इंदापूरकरांच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावण्यात येईल. इंदापूरकरांचे प्रश्न सोडवले जातील. धरणे आंदोलन प्रकरणाची सखोल माहिती घेतली आहे. त्याच्या आधारे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यात येईल.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्यासह प्रा. कृष्णा ताटे, हमीदभाई सय्यद, महादेव चव्हाण, संतोष जामदार, रमेश शिंदे, संदीपान कडवळे, जयवंत नायकुडे, राजेंद्र हजारे, अशोक पोळ, अस्लमभाई बागवान, अश्पाक इनामदार, अर्जुन शिंदे, रघुनाथ खरवडे, अभिषेक लोंढे, हाजी सलीमभाई बागवान, प्रा. बाळासाहेब मखरे, फकीरभाई पठाण, रमेश राऊत, श्रीकांत मखरे, अभिषेक लोंढे, सुनील मखरे, आरिफभाई जमादार, जाकिर मोमीन, परमेश्वर काळे आदी उपस्थित होते.