बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सलग दोनवेळा लोकसभेसाठी बारामतीकरांना भावनिक आवाहन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार यांच्याकडून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू करण्यात आला आहे. सोमवारी (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मूहुर्त साधत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काय निकाल लागेल? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला माझ्या विचाराचा उमेदवार निवडून नाही दिला तर मी विधानसभा लढवणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. असे असतानाच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामतीत प्रचाराचे बिगुल वाजले आहे.