इंदापूर : मंगळवार ७ मे रोजी बारामतीत लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. मतदान प्रक्रिया सुरू असतानाच एका व्हिडीओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ आहे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा. आमदार भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये भरणे हे शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे.
खासदार सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते नाना गवळी यांना दत्तात्रय भरणेंनी शिवीगाळ केली आहे.आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात चर्चांना एकच उधाण आले. व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी नाना गवळी यांची भेट घेतली. त्यावेळी गवळींनी घडलेला सर्व प्रसंग कथन केला. तसेच, यावेळी त्यांचा कंठ देखील दाटून आला. आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिवीगाळ केलेला प्रसंग सांगताना त्यांना रडू देखील कोसळले.