पुणे: माझा नवरा कधीही संसदेत येत नाही. परंतु, ज्याला उत्साह असेल तो आला तरी, त्याला बायको संसदेत गेल्यावर कॅन्टीनमध्येच बसावे लागते. कारण कोणाच्याही नवऱ्याला संसदेमध्ये यायला परवानगी नसते. तसेच मी माझ्या नवऱ्याच्या नावावर मतं मागत नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात महिलांशी संवाद साधला, यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हाला तुमचा खासदार खासदार संसदेत बोलणारा पाहिजे की, इथे बोलणारा नवरा पाहिजे? याचा विचार करुन मतदान करा. माझा नवरा सदानंद सुळेंनी कितीही उत्तम भाषण केले, तरी मलाच संसदेत जाऊन बोलावं लागणार आहे. तसेच माझं घर हे खासदारकीवर चालत नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगितले आहे क, तुमचे येथे काही काम नाही. आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला आहे. खंडाळ्याच्या खाली नवरा आणि इकडे मी. तुम्हाला माझ्या नवऱ्याने इथे भाषण केलेले चालेल का? संसदेत मी जाणार की माझा नवरा ? याचा विचार कुठे तरी झाला पाहिजे, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात एकूण 48 खासदार आहेत. 10 विरोधी पक्षाचे आहेत आणि 38 हे भाजपच्या बाजूने आहेत. 38 पैकी एकाही खासदाराने महागाईचा म तरी काढलाय का? तिथे गपचूप बसतात. ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत बसतात. त्यांचा महागाई, बरोजगारी आणि कोयता गँगशी काहीही संबंध नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.