पुणे : माझे वडील मितभाषी आहेत. ते फार कमी बोलतात. ते कुणाला सल्ला देत नाहीत. आता माझ्या वडिलांच्या मागे त्यांची बदनामी सुरू आहे. अदृश्य शक्ती यासाठी कामाला लागली आहे. राजकारण जरूर करा; पण असे करू नका, असा इशारा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना दिला. सुळे आज पुणे दौऱ्यावर असून, मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. या वेळी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
मी शेतकरी बांधवांच्या मालाला भाव मिळावा ही मागणी केली. मी काही नियम मोडले नाहीत. तरी मला निलंबनाची शिक्षा मिळाली. मला तुम्ही ३ वेळा मतदान करून दिल्लीला जायची संधी दिली. मी तुमची लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीत जाते. राज्यातून ४८ खासदार दिल्लीत जातात. ३८ सत्तेत आहेत तर १० विरोधात आहेत. १८ वर्षात पहिल्यादा माझं निलंबन झालं. कामासाठी, लोकांसाठी आवाज उठवला आणि निलंबन केलं तर मी १०० वेळा निलंबित व्हायला तयार आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आज संसदेत लोकशाही नाही तर दडपशाही सुरू आहे. त्यांचे ३८ खासदार भीतीपोटी काहीच बोलत नाहीत. नितीन गडकरी साहेबांचे आभार मानते. कारण त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात खूप कामे केली आहेत. आज ६ वंदे भारत रेल्वे जातात त्याचा उपयोग माझ्या मतदारसंघाला शून्य फायदा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यात ५ वर्षे भाजपची सत्ता होती. २ वर्षे झाली आपल्याला नगरसेवक नाहीये हे दुर्दैव आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचे सरकार आहे. मग आमचा काय विकास झाला आहे? स्मार्ट सिटी फक्त सांगितली गेली. पण त्यामुळे तुमच्या-आमच्या आयुष्यात काय बदल झाला? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.