पुणे : बारामती लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (७ मे) मतदान पार पडले असून, या निवडणुकीसाठी महाआघाडीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक ५६ लाख ९७ हजार रुपये प्रचारासाठी खर्च केले आहेत. तर महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी ४९ लाख रुपये प्रचारावर खर्च केल्याची बाब समोर आली आहे. दोन्ही उमेदवारांच्या खर्चात मोठी तफावत असल्याने त्यांना बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी तिसरी नोटीस बजावली आहे. बारामती मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तीन वेळा तपासणी करण्यात आली. पहिली तपासणी २५ एप्रिल, दुसरी तपासणी १ मे आणि तिसरी तपासणी ६ मे रोजी झाली. या तिन्ही तपासणीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचार खर्चात तफावत आढळली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी द्विवेदी यांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी काही खर्च मान्य केला, तर काही खर्च अमान्य केला होता.
६ मे नंतर झालेल्या तपासणीत देखील सुळे आणि पवार यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाच्या शॅडो रजिस्टरमधील खर्चात तफावत आली आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रचारासाठी ५६ लाख ९७ हजार रुपये खर्च केले आहेत. त्यांच्या खर्चात २१ लाख ९३ हजार ६८२ रुपयांची तफावत समोर आली आहे.
सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीत प्रचारासाठी ४९ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यांच्या खर्चात ३४ लाख ७७ हजार ८३ रुपयांची तफावत आली आहे. दरम्यान, प्रचार खर्चातील तफावतीबाबत नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर खुलासा करावा लागणार आहे. खुलासा न केल्यास हा खर्च मान्य असल्याचे समजून संबंधित उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. तसेच ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर ३० दिवसांत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांसमवेत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हजर राहून खर्चातील तफावत दूर करण्यात येणार आहे.