-संदिप टूले
केडगाव : संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात प्रचाराला काहीच दिवस बाकी असल्याकारणाने प्रचाराला वेग आला आहे. दौंड चे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ मंगळवार (दि.12) रोजी केडगाव येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा व महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँगेसचे (श .प.) सरचिटणीस नामदेव ताकवणे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, माजी नगराध्यक्ष बादशहा शेख, पाराजी हंडाळ, बाळासो कापरे, तालुकाध्यक्ष उत्तम अटोळे, दिग्विजय जेधे, राजाभाऊ तांबे, वंदना मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई शेळके, सोहेल खान, माजी जि. परिषद सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, बाजार समितीचे संचालक सचिन शेळके, डॉ.भरत खळदकर यांच्या सह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा.अमोल कोल्हे म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला आहे. पण त्यांचा आर्धा उत्तर प्रदेश महाराष्ट्र पोट भरायला आहे. याचे त्यांनी भान ठेवावे, पंतप्रधान मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा दिला आहे. महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, दर महिन्याला 200 चीता जाळतात याच काय केंद्रीय गृहमंत्री शहा सांगतात. भाजप शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार मात्र ती केव्हा महिन्याला दोनशे शेतकऱ्यांची सरन रचल्यानंतर, लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देता, मग लाडक्या जावयाला, भावाला व शेतमालाला भाव का देत नाही. शरद पवार यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. प्रतिवर्षी साडेबारा लाख तरुणांना रोजगार मिळेल. जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा 50 टक्के होऊन अधिक वाढण्याचा निर्णय अशा पंचसूत्रीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत महायुती सत्तेत येणार नाही…
डॉ. खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, नुकत्याच आलेल्या सर्व्हेवर जोरदार टोलेबाजी करताना सर्व्हे करणारी कंपनी ही अदानी यांची असून ते सध्या भाजपाला खुश करायचं काम करत आहे. मात्र, इतकी करुनही त्यांना 145 ते 165 एवढ्या जागा दाखवाव्या लागत आहेत. भाजपाला खुश करण्यासाठी कितीही रेटलं तरी त्यांना काठावरच्या बहुमताच्या पुढे जाता येत नसल्याचे सर्व्हे दाखवत आहेत. यामुळे केवळ काठावरचे मतदार जे आहेत, त्यांना भ्रमित करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी असे सर्व्हे दिले जात आहेत. ही कंपनी पूर्वी अनिल अंबानी यांची होती नंतर ती अदानी यांनी विकत घेतली. हजारो कोटींची गुंतवणूक असणाऱ्या उद्योगपतींना आपला इंटरेस्ट साध्य करण्यासाठी असे करावे लागते. मात्र महाराष्ट्राने आपलं मत पक्कं केलं असून आता कोणत्याही परिस्थितीत महायुती सत्तेत येणार नाही, असा टोलाही अमोल कोल्हे यांनी लगावला.
दौंड विधानसभेच्या निवडणुकीत भाकरी फिरण्याची वेळ
खा. कोल्हे म्हणाले की, कारखान्याचा सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना 44 दिवस उपोषण करण्याची वेळी आली असेल आणि ऐन दिवाळीत त्यांच्यावर मिरची आणि भाकरी खाऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ दौंड तालुक्यातील कामगारांवर आली. तर आता दौंड मध्ये आमदारकीच्या माध्यमातून भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. मागील 2019 च्या निवडणुकीमध्ये जेमतेम 637 मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी आम्ही हळहळलो होतो, अख्खा दौंड तालुका हळहळला होता. पण आता उट्टे काढण्याची वेळ आली आहे. या सभेचे प्रास्ताविक दिलीप हंडाळ यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी मानले.