शिरुर: ओतूरच्या सभेत जे बोललो त्याचे पुराव्यानिशी उत्तर देतो, मग शब्द फिरवायचा नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचे आव्हान स्वीकारले आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीचे भलं होतंय हे कळत आहे, असे म्हणत काही प्रश्न उपस्थित केले होते.
यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटलांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत, पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो, असे आव्हान दिले. डॉ. कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारत पुरावे देतो, शब्द फिरवायचा नाही असे प्रतिआव्हान आढळराव पाटलांना दिले आहे. आता डॉ. कोल्हे यांनी पुरावे दिल्यावर आढळराव आपल्या शब्दावर ठाम राहतात का? याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे.