गणेश सुळ
केडगाव : पुणे ते दौंड दरम्यान रेल्वे प्रवास करणारे हजारो विद्यार्थी, कामगार, व्यापारी, पर्यटक आणि त्याबरोबरच मोठ्या संख्येने महिला प्रवासी वर्ग देखील आहे. कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाची बायको, कोणाची मुलगी रोज कामानिमित्त दौंड, पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी, लोणी, मांजरी, हडपसर व आजूबाजूच्या गावांमधून पुण्यापर्यंत प्रवास करतात. विशेष म्हणजे या आई-बहिणींना डेमू/मेमूमधून प्रवास करताना स्वतंत्र असा डबा नाही. दुसरीकडेच पुणे ते लोणावळा प्रवास करण्यासाठी उपनगरीय ईएमयू लोकलमध्ये महिला प्रवासी वर्गाला प्रथम आणि द्वितीय श्रेणीचा डबा आहे. या प्रकाराबद्दल दौंड ते पुणे प्रवास करणाऱ्या आई, बहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे ते दौंड प्रवास करण्यासाठी डेमू/मेमूचा रेक वापरला जातो. याआधी म्हणजेच २०१७ च्या पूर्वी पुणे ते दौंड दरम्यान पॅसेंजरचा (सेकंड सिटिंग) रेक वापरला जात होता. ज्यामध्ये २ डबे महिला प्रवासी वर्गासाठी राखीव होते. पण डेमू/मेमू या मार्गावर धावत आहेत, तेव्हापासून महिला प्रवासी वर्गाला स्वतंत्र डबा नसल्यामुळे महिलांनी ‘पूणे प्राईम न्यूज’च्या बातमीदाराशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
बरेच वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी म्हणजे पुणे ते दौंड दरम्यान उपनगरीय ईएमयु लोकल सेवा. ज्यामध्ये महिला डबा (पहिला व द्वितीय श्रेणी), दिव्यांग, सामान वर्ग हे उपलब्ध आहे आणि शिवाय उपनगरीय ईएमयू लोकल ही १२ ते १५ डब्यांची बनवली आहे. ती पुणे ते दौंड या मार्गावर उपनगरीय दर्जा देऊन चालविण्यात यावी, अशी ठाम मागणी महिला वर्गाकडून रेल्वे प्रशासनाला करण्यात येत आहे.
पुणे-दौंड उपनगरीय लोकल सुरू करा…
गेली अनेक वर्षांपासून पुणे ते दौंड उपनगरीय लोकल सेवा सुरू व्हावी ही मागणी या मार्गावर होत आहे; पण रेल्वे प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. पुणे ते दौंड प्रवासादरम्यान महिला व मुलींना स्वतंत्र डबा नसल्यामुळे आम्ही महिला वर्ग रेल्वे प्रशासनाचा या “जागतिक महिला दिनी” निषेध करतो व लवकरच प्रशासनाने दौंडला उपनगरीय दर्जा देऊन ईएमयू लोकल ज्यामध्ये स्वतंत्र महिला डबा असेल, ती सुरू करावी अशी मागणी जागतिक महिला दिनी आम्ही करतो.
– नेहा शेट्टी, विद्यार्थिनी