पिंपरी : पोटच्या लहान मुलाला चटके देऊन, वरच्यावर उपाशी ठेवून, काठीने मारहाण करत असल्याचा प्रकार सांगवी येथे उघडकीस आला. या प्रकरणी (दि. ९) सांगवी पोलीस ठाण्यात क्रूर आईवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलिसाने बुधवारी (दि. ९) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये सांगवी परिसरात घडली. आरोपी महिलेने तिच्या अन्वय नावाच्या मुलाला मानसिक त्रास दिला. त्याच्या शरीराला चटके दिले. त्याला उपाशी ठेवून झाडूने व काठीने मारहाण करत होती. लहान मुलाच्या शरीरावरील चटके पाहून त्याच्या वर्ग शिक्षिकेने याबाबत त्याला विचारले. त्यानंतर आई करीत असलेल्या छळाची कहाणी त्याने सांगितली.
त्यानुसार शाळेत गस्तीसाठी येत असलेल्या दामिनी पथकातील महिला पोलिसांना शाळेने ही बाब कानावर घातली. त्यानंतर माहितीची सत्यता पडताळून महिला पोलिसाने त्या मुलाच्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.