जनार्दन दांडगे
उरुळी कांचन (पुणे) : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी 89 कोटी मंजूर झाले होते. यातच उरुळी कांचन पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या पाच एकर जागेतील ‘स्टोअरेज टँक’च्या (साठवणूक तलाव) खोदकामातून 50 हजारांहून अधिक ब्रास मुरुम निघाले होते. मात्र, या मुरूमाची परस्पर विल्हेवाट लावली गेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 89 कोटींच्या खर्चाची उरुळी कांचन पाणी पुरवठा योजना वर्षभरानंतरही कागदोपत्री असली तरी या याजनेच्या नावाखाली ग्रामपंचायतीचे काही आजी-माजी पदाधिकारी व जल जीवन मिशनचे अधिकारी मात्र ‘मालामाल’ झाल्याची चर्चा उरुळी कांचनसह परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
स्टोअरेज टँकच्या खोदकामातून निघालेल्या मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावण्याबाबत उरुळी कांचन ग्रामपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी टोलवाटोलवी करण्यास सुरुवात केली आहे. यात उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे काही आजी-माजी पदाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काही अधिकारी सहभागी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. खुल्या बाजारात सध्या सहाशे रुपये प्रतिब्रास अशा किमतीत मुरुम विकला जात आहे. यामुळे विल्हेवाट लागलेल्या 50 हजारांहून अधिक ब्रास मुरुम विक्रीतून आलेले अडीच ते तीन कोटी रुपये नेमके कोणाकोणाच्या खिशात गेले असावेत, अशी ‘खमंग चर्चा’ उरुळी कांचन परिसरात आहे.
एकीकडे या मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावल्याची चर्चा सुरु असतानाच, दुसरीकडे उरुळी कांचन ग्रामपंचायत अथवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उरुळी कांचन पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या स्टोअरेज टँकसाठी खोदाई करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी घेतली नसल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले. यामुळे स्टोअरेज टँकमधून निघालेले उरुळी कांचनचे मुरुम प्रकरण चांगलेच गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
उरुळी कांचन पाणीपुरवठा योजनेसाठी ९२१/१ या गट नंबरमधील सात एकरपैकी पाच एकर जागेत स्टोअरेज टँकसाठी मागील 8 महिन्यांपासून खोदकाम चालू आहे. या खोदकामातून निघालेला 50 हजारांहून अधिक ब्रास मुरुम शासनाची अथवा ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या काही आजी-माजी पदाधिकारी व जल जीवन मिशनचे अधिकारी यांनी संगनमताने विक्री केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सध्या मुरुम 600 रुपये प्रतिब्रास विकला जात आहे. 50 हजाराहून अधिक ब्रास मुरुम विक्रीतून आलेले अडीच ते तीन कोटी रुपये नेमके कोणाकोणाच्या खिशात गेले असावेत याच्या सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत उरुळी कांचन पाणीपुरवठा योजनेसाठी मागील वर्षी तब्बल ८९ कोटी ५३ लाख २ हजार निधी मंजूर झाला होता. पाणी पुरवठा योजनेसाठी मोठा निधी मंजूर झाला असला तरी, साठवणूक तलावासाठी ग्रामपंचायतीकडे पुरेशी जागा नसल्याने या योजनेचे भवितव्य अधांतरीत वाटत होते. यातून मार्ग काढण्यासाठी पाणी पुरवठा योजनेच्या साठवणूक तलावासाठी, ग्रामस्थांनी गावातीलच श्री राम देवस्थान ट्रस्टकडे सात एकर जागेची मागणी केली होती. दरम्यान, पाणी पुरवठा कार्यान्वित झाल्यास उरुळी कांचनच्या नागरिकांना शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी मिळेल, या उद्देशाने गावातीलच श्री राम देवस्थान ट्रस्टनेही मोठ्या मनाने त्यांच्या मालकीची सीताई इनाम जमिनीची 7 एकर जागा 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर योजनेसाठी देऊ केली होती. मात्र, या जमिनीचा देवाण-घेवाणीचा करार पूर्ण होण्यापूर्वीच, ग्रामपंचायतीने खासगी ठेकेदारामार्फत स्टोअरेज टँकसाठी खोदकाम सुरू केले. त्यातून निघालेल्या 50 हजाराहून अधिक ब्रास मुरुमाची विल्हेवाट लावल्याची बाब पुढे आली आहे.
स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तक्रार करूनही कारवाई नाहीच !
उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व जल जीवन मिशनचे अधिकारी यांनी आपआपसातील संगनमताने स्टोअरेज टँक खोदकामातून निघालेल्या 50 हजाराहून अधिक ब्रास मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावली. त्यांनी शासनाच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या गौणखनिज उत्पन्नावर डल्ला मारल्याची तक्रार भाजपचे जेष्ठ नेते सुनिल कांचन व उरुळी कांचन भाजपा शहराध्यक्ष अमित कांचन यांनी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे यापूर्वीच केली आहे. मात्र, या तक्रारीवर शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न झाल्याने उरुळी कांचनची पाणी पुरवठा योजना नागरिकांच्या भल्यासाठी की ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यासह जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यांच्या भल्यासाठी आहे? असा प्रश्न उरुळी कांचनच्या नागरिकांना पडला आहे.
अशीही टोलवाटोलवी, मग मुरुम कुठे गेला?
मुरुमाबद्दल बोलताना उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस म्हणाले, ‘उरुळी कांचन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीखाली चालू आहे. त्याच्याशी आमचा काहीही संबध नाही. स्टोअरेज टँक खोदकामातून निघणाऱ्या मुरुमाची अथवा मातीची साठवणूक करण्यासाठी जागा दाखवल्या होत्या. मात्र, त्यांनी मुरुम कुठे नेऊन टाकला याची आम्हाला काहीही कल्पना नाही’, असे सांगितले. तर त्याचवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मात्र मुरुम कोणी व कुठे टाकला याबाबत काहीही माहिती नसल्याचा दावा केला. स्टोअरेज टँक खोदकामातून निघालेला मुरुम हा ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्याचेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता महादेव देवकर यांनी सांगितले. मुरुमाबद्दल दोघांनीही टोलवाटोलवी सुरु केली असली तरी, मग मुरुम कुठे असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.