लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील 10 तासाहून अधिक वाहतूक कोंडी झाली आहे. तर महामार्गावरील थेऊर फाटा ते उरुळी कांचन या 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचा प्रकार बुधवारी (ता. 18) दिसून आला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी आखलेला प्लॅन फेल झाल्याचे दिसून येत आहे. तर या वाहतूक तासनतास अडकून बसल्याने, याचा वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी वाहतुकीत बदल केले होते. मंगळवारी (ता.17) मध्यरात्री पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा येथून केसनंद कडून पुढे नगर रस्त्याच्या दिशेने वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठा वळसा घालून पुण्याकडे जावे लागत होते. काही चालकांनी या रस्त्याला पसंती दिली. मात्र काही चालकांनी पुण्याच्या दिशेकडे वाहतूक सुरु झाल्यानंतर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मध्यरात्रीपासून थेऊर फाटा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस थेऊर फाटा परिसरात मध्यरात्री पासून वाहतूक नियमन करीत होते. मात्र या ठिकाणी मनुष्यबळ अत्यंत अल्पप्रमाणात होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांबरोबर कुंजीरवाडी येथील काही नागरिक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत करीत होते. सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणारा महामार्ग बंद होता. मात्र पुण्याकडून सोलापूरकडे जाणारा महामार्ग मोकळा होता.
वाहतूक कोंडी सोडविण्यात पोलीस व्यस्त असताना, काही वाहनचालकांनी याचा फायदा घेत पुण्याकडून सोलापुरच्या दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाड्या घालण्यास सुरवात केली. त्यांच्या पाठोपाठ अनेक चालकांनी गाड्या घातल्या. त्यामुळे पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाणारा रस्ताही वाहतूक कोंडीने ब्लॉग झाला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. आणि महामार्गावर थेऊर फाटा ते उरुळी कांचन असा 10 किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या. तर महामार्गावर मध्यरात्री दीड वाजल्यापासून बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
पुणे सोलापूर महामार्गावरील नाकाबंदीचा कालावधी संपल्यानंतर दोन्ही लेन वरील वाहतूक सुरु करण्यात आली. त्यानंतर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. मात्र या दहा तासात पोलिसांना महामार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी नाकीनऊ आले. मात्र या वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक, नोकरदार, विद्यार्थी, कामगार व सर्व सामान्य नागरिकांना बसला आहे.
बेशिस्त वाहनचालक जोमात, वाहतूक कोमात…
हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसराचा विस्तार दिवसागणिक वाढत चालला आहे. या ठिकाणी कायमच नागरिक अन् वाहतुकीची वर्दळ सुरू असते. पुणे सोलापूर महामार्गावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यात काही बेशिस्त नागरिक चारचाकी वाहन वाटेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यामुळे बेशिस्त वाहनचालक जोमात अन वाहतूक व्यवस्था कोमात अशी नागरिकांना म्हणण्याची वेळ आली आहे.
लोणी काळभोर वाहतूक विभागाचा अतिरिक्त पदभार हा हडपसर वाहतूक विभागाकडे देण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये. म्हणून पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक थेऊर फाटा येथून केसनंदच्या दिशेकडे वळविण्यात आली होती. मात्र पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी सारखी होत असते, हे माहिती असताना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यासाठी अत्यल्प कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. या ठिकाणाची वाहतूक कोंडी आवाक्याच्या बाहेर होती. पण वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांनी त्यांचे कर्त्यव्य चोख बसविले आहे. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वाहतूक कोंडीचे नियोजन फेल झाले आहे.
– सचिन तुपे (माजी सरपंच – कुंजीरवाडी, ता. हवेली)