पुणे : अल्पवयीन मुलींची छेडछाड, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. इमारतीच्या लिफ्टमधून खाली जात असताना एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केल्याची घटना न्यू नाना पेठ येथे घडली. याप्रकरणी एकावर समर्थ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने सोमवारी (ता. ११) समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन इरफान ताज्जुदिन खान (रा. वानवडी गाव) याच्यावर पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (ता. १०) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी न्यू नाना पेठेतील एका सोसायटीमध्ये वास्तव्याला आहे. रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास दूध खरेदी करण्यासाठी ती इमारतीच्या लिफ्टमधून खाली जात होती. दरम्यान, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. या वेळी आरोपी इरफान खान लिफ्टमध्ये चढला. आसपास कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत त्याने मुलीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केला.
दरम्यान, घाबरलेल्या मुलीने याबाबत घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना सांगितले. यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक यादव करीत आहेत.