पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन जाणाऱ्या महिलेच्या अंगावर पाणी टाकून अश्लील शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. तसेच तिचे कपडे फाडून असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 48 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. याबाबत 20 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून समीर अहमद अब्दुल कादीर शेख (वय-48 रा. हडपसर) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.4) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हि घटना हडपसर परिसरात घडली आहे. फिर्य़ादी महिला त्यांच्या नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन रस्त्यावरुन जात होत्या. त्यावेळी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या आरोपी समीर शेख याने इमारतीवरुन पाणी टाकले. हे पाणी महिलेच्या अंगावर पडले. त्यामुळे महिलेने याबाबत आरोपीकडे विचारणा केली. यावेळी त्याने महिलेसोबत वाद घालायला सुरुवात केली तसेच अश्लील बोलून शिवीगाळ केली.
त्यानंतर इमारतीच्या खाली येऊन फिर्यादी महिलेच्या अंगावरील कपडे ओढून फाडले. समीर शेख याने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.