वाघोली : पुण्यातील स्वारगेट येथे सन २०१३ मध्ये कुणाल शंकर पोळ याचा खुन करण्यात आला होता. त्या प्रकरणातील आरोपिताचा खुन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एन्जॉय ग्रुपच्या ८ जणांविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनकडून पाठविण्यात आलेल्या मोक्का प्रस्तावास अपर पोलीस आयुक्तांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मंजूरी देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप, सुमित उत्तरेश्वर जाधव, अमीत म्हस्कु अवचरे, ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव, अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे, राज बसवराज स्वामी, लतिकेश गौतम पोळ, रौफ बागवान यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्टला विशाल सातपुते यांचे सहकारी असलेले राजू शेवाळे हे कोर्टाची तारीख असल्याकारणाने गेले असता विरोधी गट व त्यांच्या गटामध्ये रागाने पाहिल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
त्याच रात्री साडे अकराच्या सुमारास मांजरी-कोलवडी रोड येथे राजू शेवाळे यांचा घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी एन्जॉय ग्रुपच्या ८ जणांवर कारवाई करून त्यांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून ७ पिस्टल २३ जिवंत काडतुसे जप्त केली होती. अशाचप्रकारे संघटितपणे वारंवार गुन्हे करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्भाव करणेकामी लोणीकंद पोलिसांनी प्रस्ताव तयार करुन सादर केला होता.